जगताप लक्ष्मण पांडुरंग यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६३ रोजी पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव या गावामध्ये श्री.पांडुरंग खंडोजी जगताप व सौ.चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या भक्तीमय व शेतकरी कुटुंबामध्ये झाला.
एखाद्या गोष्टीच्या सानिध्यात परीस आला की त्या गोष्टीचं सोनं होतं, त्याचप्रमाणे लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात विकसित होत असलेले पिंपरी चिंचवड शहर सांकृतिक,औद्योगिक व आर्थिकदृष्ट्या वैभवशाली झाले.
सुमारे ४० वर्षांपूर्वी पिंपळे गुरव, सांगवी हा परिसर म्हणजे एक साधं खेडेगाव. लाईट,पाणी आणि रस्ते या सर्व जीवनावश्यक सुविधांपासून वंचित असं गाव. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी व्यवसायासाठी, रोजगारासाठी नागरिकांना आपल्या पिंपरी चिंचवड शहरातून पुणे शहरात करावी लागत असलेली दैनंदिन कसरत या सर्व गोष्टी विचारात घेऊन लक्ष्मण जगताप यांनी वडील पांडूरंग आणि आई चंद्रभागा यांच्या आशीर्वादाने, कुटुंबाचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे घेऊन जात तरूण वयातच राजकारण आणि समाजकारणाचे धडे घेण्यास सुरुवात केली.
त्याच दरम्यान आजूबाजूची गावे एकत्र करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निर्मिती झाली होती. १९८६ साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये लक्ष्मण जगताप निवडून आले आणि त्यांनी पिंपळे गुरव मधून पहिल्यांदा नगरसेवक होण्याचा मान मिळावला.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये असलेली पिण्याच्या पाण्याच्या समस्या , लाईटची समस्या सोडवून याबरोबरच वाहतुकीसाठी चांगले रस्ते नागरिकांसाठी उपलब्ध असावेत असा अट्टहास घेऊन लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे गुरवमध्ये सुरुवातीच्या काळात स्थानिक पातळीवर विविध विकासकामे करण्यास सुरवात केली आणि या भागाच्या विकासाचा पाया रोवला.
थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन अत्यंत कमी कालावधीमध्ये पिंपळे गुरव या गावाचे रुपांतर एका देखण्या शहरी भागामध्ये झाले. प्रशस्त रस्ते, उंच इमारती तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या पुरेशा बससेवा या सर्व गोष्टींमुळे पिंपळे गुरव परिसरामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होऊ लागले. आपल्या कार्याच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रसिद्धी मिळवली. दिवंगत नेते श्री.रामकृष्ण मोरे यांच्यानंतर प्रथमच पिंपरी चिंचवड शहरासाठी लक्ष्मण जगताप यांच्या रूपाने एक लोकाभिमुख नेतृत्व उदयास आले.
आपल्या कार्य प्रेरणेने आणि नागरिकांनी ठेवलेला विश्वास जपत लक्ष्मण जगताप यांनी इ.स.१९८६ ते इ.स.२००७ पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक पद भूषविले. त्याच दरम्यान १९९३ साली सभापती स्थायी समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि जबाबदारी पार पाडली.
शहरात अनेक नवनवीन प्रकल्पांना, विकासकामांना त्या काळात मंजुरी देण्यात आली. लक्ष्मण जगताप यांच्या कामाची पद्धत आणि पिंपरी चिंचवड शहराला एक नवे रूप देण्याची संकल्पना पाहता त्यांना २००२ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पदाची जबाबदारी लक्ष्मण जगताप यांच्यावर सोपवण्यात आली.त्यानंतर लक्ष्मण जगताप यांनी आपल्या विकासाभिमुख कार्याद्वारे आणि प्रचंड जनसंपर्काद्वारे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करीत आपली पकड मजबूत केली.
अवघ्या काही वर्षात आपल्या परिसराचा केलेला कायापालट तसेच कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा असेलला प्रचंड विश्वास याच जोरावर आपण राज्य पातळीवर आपल्या शहराचे नेतृत्व करावे असा अट्टहास पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी धरला. कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास आणि सर्व वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद यामुळे २००४ साली महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आले.
पिंपरी चिंचवड शहराला आर्थिक व ऐतिहासिक तसेच वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आहे. छत्रपती शिवराय तसेच चाफेकर बंधू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत मोरया गोसावी यांच्या आशीर्वादाने, भक्तिमय वातावरणाने समृद्ध अशा या शहराचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी लक्ष्मण जगताप यांना जनतेने दिली.
तब्बल १५ ते २० वर्षानंतर पिंपरी चिंचवड शहराला एक दूरदृष्टी लाभलेले नेतृव मिळाले असे प्रत्येक नागरिकाला वाटू लागले आहे. शहरातील विकासकामांच्या जोरावर प्रचंड ख्याती मिळवलेल्या लक्ष्मण जगताप यांनी जनतेने दिलेल्या संधीचे सोनं केले असं म्हणणे वावगे ठरणार नाही.
आपली विधानपरिषदेची कारकीर्द यशस्वीरित्या पार पडल्यानंतर २००९ साली विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत केला. कोणत्याही पक्षाचा पाठींबा न घेता अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी सर्वांनी आग्रह केला. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आजवर इथपर्यंत लढण्यासाठी बळ दिले असे मत मांडून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला.
लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी चिंचवड शहराचे नवीन रूप, त्यांच्याकडून शहरवासीयांना असलेल्या अनेक अपेक्षा तसेच सामाजिक क्षेत्रात आपली कामगिरी चोख पार पडणारा आणि दिलेले वचन पाळणारा लोकनेता म्हणून ते प्रसिद्ध होते. याच जोरावर २००९ साली चिंचवड विधानसभेचे आमदार म्हणून अपक्ष निवडून आले.
विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले असता पिंपरी चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांना सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, साडेबारा टक्के परतावा, प्राधिकरणाने हस्तांतरित केलेल्या जमिनी असे मोठे प्रश्न विधानसभेत उपस्थित केले.
पिंपरी चिंचवड शहरातील एकही नागरिक बेघर होता कामा नये यासाठी त्यांनी ठीकठिकाणी आंदोलने केली. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला त्यांनी प्रथम प्राधान्य दिले. समाजहिताची कामे करत असताना अनेकांच्या भावना दुखावल्या जातात पण पिंपरी चिंचवड शहराचा भौगोलिक विकास करत असताना इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी दुय्यम अशी प्रतिक्रिया त्यांनी नागरिकांनी मध्ये पोहचवली.
आरोग्य आणि व्यायामाची प्रचंड आवड असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड परिसरामध्ये श्री.श्री.रवि शंकर, रामदेवबाबा, यांच्या योग शिबिर तसेच समाजोन्नतीसाठी कार्य करणाऱ्या सद्गुरू वामनराव पै यांच्या अध्यात्मिक शिबिरांचे आयोजन केले. पिंपरी चिंचवड शहरातील लाखो नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेता आला .
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आणि पुणे जिल्ह्यात प्रथमच "मोफत महाआरोग्य शिबीर" चे आयोजन केले याचा ५० हजाराहून अधिक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला. रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून २०१५ ते २०१९ सलग पाच वर्षे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांनी केले.
त्याच बरोबर क्रीडा क्षेत्राची देखील आवड असल्यामुळे त्यांनी लक्ष्मण जगताप कला क्रीडा अकादमी अंतर्गत विविध स्पर्धा भरविण्यास सुरवात केली. सी.एम.चषक अंतर्गत विविध स्पर्धेंचे आयोजन त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात केले.आपल्या अकादमी अंतर्गत खेळत असलेल्या स्पर्धकाने पिंपरी चिंचवड शहराचे नाव लौकिक वाढवावे या हेतूने त्यांनी खेळाडूंना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय खेळांमध्ये विशेष मार्गदर्शन केले.
दिवाळीच्या सणानिमित्त दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
महिला सक्षमीकरण करण्यासाठी पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत बचत गट, घरकाम करणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध झाले. पिंपरी चिंचवड शहरातील महिलांसाठी चारचाकी वाहन प्रशिक्षण, शिलाई मशीनचे वाटप तसेह संगणक प्रशिक्षण केंद्र चालू केले.
शहराचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सक्षम नाही वारंवार पाठपुरावा करून देखील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागत नसल्या कारणाने लक्ष्मण जगताप यांनी २०१४ साली आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली.
२०१४ साली श्री. नंरेंद्रजी मोदी यांनी नवीन भारत संकल्पना घेऊन देशभरातील नागरिकांना विश्वास दिला. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी भूमिका समस्त पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी घेतली. सर्वांच्या एकमताने लक्ष्मण जगताप यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षप्रवेश केला.
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने लक्ष्मण जगताप हे आमदार म्हणून प्रचंड बहुमतांनी निवडून आले. श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र् राज्यात भाजपाची एकहाती सत्ता स्थापन झाली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली.
अवघ्या काही कालावधीमध्ये प्रलंबित असलेले अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, साडेबारा टक्के परतावा, प्राधिकरणाने हस्तांतरित केलेल्या जमिनी, मोशी कचरा डेपो, असे अनेक प्रश्न विधानसभेमध्ये पुन्हा उपस्थित झाले. मा. मुख्यमंत्री यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्यास मदत केली.
पण त्याच बरोबर औद्योगिकीकरणामुळे पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता निर्माण झालेल्या पाणी टंचाई समस्येवर लक्ष्मण जगताप यांनी लक्ष देण्यास सुरवात केली. भामा-आसखेड धरणातून पिंपरी चिंचवड शहरासाठी मोठ्या प्रमाणात वाढीव पाणी कोटा मंजूर करून घेतला.
या सर्व कार्यांची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने २०१६ साली लक्ष्मण जगताप यांच्या हाती भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदाची धुरा दिली. शहराध्यक्ष पदावर विराजमान होताच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या पहिल्या दहा शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा समावेश लक्ष्मण जगताप यांनी करवून घेतला.
"औद्योगिक शहर ते मेट्रो सिटी" या ब्रीद वाक्यानुसार शहराच्या विकासाला गती देण्यासाठी लक्ष्मण जगताप यांनी अथक प्रयत्न केले. निगडी ते पुणे मेट्रो प्रकल्प, सिमेंटचे प्रशस्त रस्ते, वाहतुकीसाठी अडथळा होत असलेल्या भागात भुयारी मार्ग, प्रशस्त उड्डाणपूल, पीएमपीएमएल बससाठी बी.आर.टी.मार्ग, नागरिकांसाठी गार्डन या सर्वांच्या माध्यमातून शहराला नवीन रूप देण्याच काम स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आले.
शहर विकासाबरोबरच पक्षवाढीसाठी आणि संघटनेसाठी आपल्यावर पक्षाने टाकलेला विश्वास आणि आपली जबाबदारी ओळखून त्यांनी कार्य करण्यास सुरवात केली. भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे आश्वासन त्यांनी सर्वांना दिले.
यांच्या कार्यसंकल्पनेने प्रभावित होऊन आणि त्यांच्यावर विश्वास ठेऊन अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वामध्ये लढवलय गेलेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या २०१७ निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने एकहाती विजय संपादन केला. तब्बल १५ वर्षानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये सत्ताबदल झाला.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही या विचाराने त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शहरामध्ये जोमाने कार्य करण्यास सुरवात केली.अवघ्या कमी कालावधीत पिंपरी चिंचवड शहरामध्ये ठिकठिकाणी सिमेंट रस्ते, स्वच्छ सुंदर आणि आदर्श शहर बनविण्यासाठी शहराला स्मार्ट बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोठ-मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली,शहराला एक नवीन ओळख देण्याचं काम स्मार्टसिटी मिशन अंतर्गत करण्यात आले.
शहरात केलेल्या विकासकामाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने २०१९ साली पुन्हा पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याची संधी दिली.२०१९ साली झालेल्या निवडणुकीमध्ये शहरवासीयांनी पुन्हा प्रचंड विश्वास ठेवत बहुमतांनी निवडून दिले. सलग चौथ्यांदा आमदार म्हणून लक्ष्मण जगताप निवडून आले.
लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वात गेल्या २० वर्षात झालेला पिंपरी चिंचवड शहरातील विकास हा राज्यात आदर्श निर्माण करणारा आहे. राजकीय आयुष्य जगत असताना समाजकारणाला त्यांनी कधी अंतर दिले नाही. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करण्याच काम ते करत आहेत. लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारा, दिलेला शब्द पाळणारा लोकनेता, गरज पडल्यास आक्रमकपणे जनहितासाठी लढणारा नेता अशी त्यांनी ख्याती निर्माण झाली आहे.
मोठमोठी विकासकामे आणि दांडगा जनसंपर्क तसेच जनतेमध्ये असलेली लोकप्रियता त्यामुळे ते शहराच्या विकासात नेहमी अग्रस्थानी राहिले. आव्हानांना आव्हान देणारे आणि दिलेला शब्द पाळणारा लोकनेता अशी धमक असलेले नेतृत्व हि त्यांची ओळख आहे.त्यांचे जमिनीवरचे नेतृत्व तेव्हाही आणि आत्ताही कायम आहे येथेच कर्तृत्व सिद्ध होते.